महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : चीनमधील या नव्या व्हायरसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा तर मीडिया रिपोर्टनुसार, HMPV हा नवा व्हायरस चीनमध्ये वेगाने पसरतोय. देशातील रुग्णालयात स्मशानभूमीप्रमाणे मृतदेह दिसत आहेत, असा दावाही केला जातोय. अनेक लोकांना या व्हायरसची लागण होताना दिसत आहे. चीनमधील रुग्णालयात होत असलेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. HMPV, कोरोना आणि माइकोप्लाज्मा न्यूमोनिया यासारखे आजार देखील वेगाने पसरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चीनमधील यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं. कोविडमुळे जगभरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता कोरोनासारख्या आणखी एका व्हायरसने तोंड वर काढलंय. कोरोनानंतर पाच वर्षांनी चीनमध्ये नवा व्हायरस पसरलाय. चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) हा व्हायरस वेगाने पसरतोय. संपूर्ण देशातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. शिवाय स्मशानभूमीमध्ये मृतदेहांचा खच पडलाय.
एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये सध्या HMPV या नव्या व्हायरसमुळे हाहा:कार पाहायला मिळतोय. HMPV झाल्यानंतर ताप येतो, शिवाय याची लक्षणे कोरोना व्हायरस सारखीच आहेत. त्यामुळे चीनची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र, अजूनपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात चीनला यश आलेले नाही. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी चीनमधील परिस्थितीचे निरीक्षण करत आहेत. कोरोनानंतर अवघ्या पाच वर्षांनी चीनमध्ये HMPV ने लोकांचं टेन्शन वाढलंय. HMPV या व्हायरसने चीनमधील नागरिक चिंतेत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लोकांनी सातत्याने मास्क वापरावा, सातत्याने हात धुवावेत, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय.
व्हायरसचं सत्य काय?
ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा एक आरएनए व्हायरस आहे. याचा शोध सर्वात प्रथम 2001 मध्ये डच संशोधकांनी घेतला होता. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या बाल रुग्णांच्या सॅम्पलची चाचणी करत असताना या व्हायरसची माहिती समोर आली होती. दरम्यान, हा व्हायरस गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात असल्याचा दावा तत्कालीन संशोधकांनी केला होता. या व्हायरसची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. हा व्हायरस प्रामुख्याने खोकला आणि शिंक आल्यानंतर वेगाने पसरतो.लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरतो
या विषाणू लहान मुले आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरतो. व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाऱ्यांनी पुन्हा मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मास्क घालावे असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच आपले हात वारंवार स्वच्छ करत रहा, असंही आवाहन करण्यात आलंय.