नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत पात्र ठरलेल्या ८१८ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून यामध्ये पेसा क्षेत्रातील ६४६ तर बिगर पेसा क्षेत्रातील १७२ उमेदवारांचा समावेश आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमधील पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ५ ऑगस्ट २०२३ रोजी याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, आयपीबीपीएस संस्थेकडून विविध संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल प्राप्त झाल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड व अंतिम प्रतिक्षा यादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलव्दारे भरण्यात आली आहेत.
अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत शासन निर्णय व ग्रामविकास विभागाकडील पत्र तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून पेसा क्षेत्रात मानधन तत्वावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात जिल्हा परिषद नाशिकसाठी १५९७ पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये आतापर्यंत पेसा क्षेत्रातील ६४६ तर बिगर पेसा क्षेत्रातील १७२ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. तर बिगर पेसा क्षेत्रातील कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के, आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्याचे कामकाज संबंधित विभागाकडून सुरू आहे.
