महिलांचे अचूक नियोजन, तरुणांचा जल्लोष; सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश
नाशिक (प्रतिनिधी): डी.जी.पी. नगर नं. 2 परिसरात वज्रकाय हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव यंदा अभूतपूर्व जल्लोषात, भव्यतेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. धार्मिकतेसोबतच सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक वारसा आणि युवक-स्त्री शक्तीचा संगम घडवणारा हा उत्सव परिसरासाठी ऐतिहासिक ठरला.
उत्सवाच्या पहिल्याच दिवशी हनुमानरायांच्या चांदीच्या दागिन्यांची भव्य व मानाची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले शेकडो भाविक जयघोष करत सहभागी झाले होते. मार्गभर फुलांची उधळण, आकर्षक सजावट आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त स्वागतामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे, स्वयंसेवकांच्या काटेकोर नियोजनामुळे मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पार पडली.
लहानग्यांसाठीही विशेष आकर्षण ठरले. ‘मोटू पतलू’ आणि ‘तात्या इंचू’ यांच्या वेशातील कलाकारांनी बालचमूचे मन जिंकले. मुलांनी त्यांच्यासोबत फोटो काढत आनंद लुटला, तर पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
दुसऱ्या दिवशी शाहीर चंद्राकांत माने यांच्या “महाराष्ट्राचा शाहीरीबाणा” कार्यक्रमाने उत्सवाला वेगळीच उंची मिळवून दिली. “संपत्तीपेक्षा स्वाभिमान मोठा, जातीपेक्षा धर्म मोठा” असा संदेश देत त्यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील जोशपूर्ण पोवाड्यांनी हजारो नागरिकांच्या अंगावर शहारे आणले.
तिसऱ्या दिवशी 111 जोडप्यांच्या हस्ते मारुतीरायाची भव्य महाआरती पार पडली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने भक्तिभावाचा परमोच्च क्षण अनुभवायला मिळाला. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
या भव्य उत्सवाच्या यशामागे परिसरातील महिलांचे नियोजनबद्ध योगदान विशेष ठरले. संपूर्ण आयोजनात त्यांनी जबाबदारीने पुढाकार घेतला. त्याचबरोबर स्थानिक तरुणांनीही श्रमदान, व्यवस्थापन आणि उत्साहाच्या जोरावर कार्यक्रमाला यशस्वी केले.
उत्सवासाठी एएसएम ग्रुप, सप्तश्रृंगी स्टोन मेटल, मराठा फाउंडेशन, साम्राज्य प्रतिष्ठाण, शुराय उद्योग समूह आणि जिजे ॲग्रो इंडिया प्रा. लि. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. एकूणच, वज्रकाय हनुमान मंदिर ट्रस्टच्या पुढाकारातून साजरा झालेला हा हनुमान जन्मोत्सव केवळ धार्मिक उत्सव न ठरता सामाजिक ऐक्य, संस्कृती जपण्याची भावना आणि नागरिकांच्या एकजुटीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.
