टँकरची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर: २०१९ नंतर पहिल्यांदा उच्चांक

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात मान्सून डेरेदाखल झाल असताना नाशिक जिल्ह्यातील टंचाईचे संकट अधिक गडद बनले आहे. २०१९ नंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच टँकरने ३९८ चा आकडा गाठला आहे. तब्बल ७ लाख १६ हजार ५०१ लोकसंख्येची तहान टँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे.
यंदा वेळेआधीच देशात मान्सूनने आगमन केले असून, महाराष्ट्राच्या काही भागातही त्याने वर्दी दिली आहे. पण, त्याचवेळी नाशिमध्ये दुष्काळाची भीषणता अधिक वाढली आहे. गावोगावी पाण्याचे स्रोत आटले असून, धरणांमधील जल साठ्यानेदेखील तळ गाठला आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत ३६२ गावे आणि ९४१ वाड्या अशा एकूण १ हजार ३०३ ठिकाणी ३९८ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. नांदगावच्या खालोखाल येवल्यात ११८ ठिकाणी ५७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मालेगावी ५६, सिन्नर ४६, तर बागलाणला ४२ टँकर सुरू आहेत. याशिवाय पाणी पुरवठ्यासाठी २१३ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
वर्षभर टँकर सुरू
जिल्ह्याच्या काही भागांत गेल्यावर्षी उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर अद्यापही कायम आहे. एप्रिल व मे महिन्यात झपाट्याने टँकरच्या संख्येत वाढ होत जाऊन ते ३९८ वर पोहोचले आहे. यापूर्वी २०१९ ला वर्षभर टँकर सुरू होते. तेव्हाची टँकरची उच्चांकी संख्या ३९८ होती. यंदा दुष्काळाची स्थिती बघता २०१९ मधील टँकरचा उच्चांक मागे पडण्याची शक्यता आहे.

One thought on “टँकरची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर: २०१९ नंतर पहिल्यांदा उच्चांक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!