भुजबळांनी भाजपात जाऊन प्रश्न सोडवावेत; कार्यकर्त्यांनी मांडली भूमिका

पंचवटी (प्रतिनिधी): छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षात जावे आणि सत्तेत राहूनच प्रश्न सोडवावेत, अशा भूमिका समता परिषदेच्या मेळाव्यात मांडण्यात आल्या. त्यावर लगेच भाष्य न करता भुजबळांनी कार्यकर्त्यांना संयमाने घेण्याचा, तसेच राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलने, निदर्शने करण्याचा सल्ला भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, यावेळी भुजबळ यांनी शेरोशायरी सादर करीत त्यांनी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी समता परिषदेच्या मेळाव्यातून जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत, हिवाळी अधिवेशनाला जाणार नसल्याचे जाहीर केले. बुधवारी (दि. १८) नाशिकमध्ये आयोजित समता परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते म्हणाले की, गेल्या चार दिवसांपासून कार्यकर्त्यांची मने खिन्न आहेत. अनेकांना धक्का बसला आहे. ही गोष्ट येवला, लासलगावपुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात दिसत आहे. आपल्याला संपवायला निघणाºयांना आपला विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. आता मला राज्यसभेवर जाण्यासाठी सांगितले जात असले, तरी ज्यांनी माझ्यासाठी जिवाचे रान केले त्यांना काय उत्तर द्यायचे, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्या, असे सांगितले. मात्र, कुठे बिघडले ते कळले नाही. त्यामुळे आता समाजाची ढाल बनून कोण उभा राहील, असा प्रश्न असून, मंत्रिपद मिळाले नाही, त्याविषयी काही वाटत नाही. मात्र, अवहेलना झाल्याची खंत आ. भुजबळांनी व्यक्त केली.
‘कभी डर ना लगा, मुझे फासला देखकर, मैं बढता गया, रास्ता देखकर, खुदही खुद नजदीक आती गयी मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर’, अशी पहिली शायरी त्यांनी सादर केली. त्यानंतर ‘मैं मौसम नही हूँ जो पल में बदल जाऊँ, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊँ, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना, हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ’, अशी शायरी सादर करीत राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची आठवण भुजबळांनी वरिष्ठांना करून दिली.
यावेळी ओबीसी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, डॉ. कैलास कमोद, माजी आमदार पांडुरंग अभंग, पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब कर्डक, राजाराम पाटील आदींंसह राज्यभरातून आलेल्या पदाधिका-यांची भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!