पाणीपुरवठ्याच्या तक्रारींवर पांघरूण घालतेय का महापालिका?

वितरण व्यवस्थेतील त्रुटी, गळतीकडे मात्र दुर्लक्ष

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आणि कमतरता असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र सर्व दोष नागरिकांवरच ढकलून आपल्या चुकांवर आणि नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून येणा-या तक्रारींवर एकप्रकारे पांघरूण घालण्याचाच प्रकार केला आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे ‘जखम डोक्याला अन् मलम गुडघ्याला’असाच म्हणावा लागेल.
गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याविषयी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विशेषत: पंचवटी, कलानगर, इंदिरानगर, सिडको आणि सातपूर या भागातून नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. मागील आठवड्यात तर आ. देवयानी फरांदे आणि आ. अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा व साथरोग या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनाची तीव्र शब्दंत कानउघडणी केली होती. संबंधित तिन्ही मुद्द्यांवर तत्काळ कार्यवाही न झाल्यास अधिका-यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा, तसेच खुर्चीवर बसू न देण्याचा इशारा आमदारांनी दिला होता. त्यानुसार प्रशासनातील अधिकारी व आयुक्त कामाला लागले असले तरी पाणीपुरवठ्याविषयी मात्र प्रशासनाकडून अद्यापही पुरेशी कार्यवाही झालेली नाही. याउलट प्रशासनाने नागरिकांनीच पाणी कसे जपून वापरावे, टाक्या ओव्हरफ्लो होऊ देऊ नयेत, आंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नये अशा प्रकारचे आवाहन केले आहे. तसेच, नाशिक महापालिका जमिनीखालील टाकीत किंवा तळमजल्यापर्यंतच पाणीपुरवठा करण्यास बांधील आहे. यास्तव वरील मजल्यावर थेट पाणीपुरवठा होत नसल्याबाबतच्या तक्रारींचा विचार होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मनपाने सूचित केले आहे. त्याचबरोबर नळीचा वापर करून वाहने धुऊ नयेत, तसेच अंगणात अथवा रस्त्यावर सडा मारून पाण्याचा अपव्यय करू नये अशा प्रकारचे आवाहन मनपाने केले आहे. मुळात मनपाने केलेली आवाहनवजा जनजागृती योग्यच आहे. मात्र, महापालिकेकडून पाणी वितरण करताना होत असलेला अपव्यय वा गळती कमी करण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली जात नाही. असा सवालही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!