नाशिक | प्रतिनिधी : नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानावर दि. २० ते २४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ‘मराठा प्रीमियर लीग’ (पर्व पहिले) या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगला असून, क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नाशिक जिल्ह्यातील ही सर्वाधिक अडीच लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा ठरली असून, शहरासह ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक संघाला शिवस्वराज्यातील ऐतिहासिक गडकोटांची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे स्पर्धेला ऐतिहासिक अभिमानाची जोड मिळाली आहे. सामने सायंकाळच्या सत्रात प्रकाशझोतात खेळवले जात असून, प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन चंद्रकांत बनकर, सोपान कडलक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. उद्घाटन प्रसंगी खेळाडूंना सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच प्रत्येक संघाला शिवचरित्र आणि जिजाऊ चरित्र भेट देण्यात येत आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये इतिहासाची जाणीव आणि संस्कार रुजविण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्पर्धेचा भव्य समारोप २४ फेब्रुवारी रोजी होणार असून, यावेळी मनोज जरांगे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, शिवाजीराजे जाधवराव यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजेत्या संघाला अडीच लाख रुपये रोख पारितोषिकासह चषक प्रदान करण्यात येणार आहे. उपविजेत्या संघालाही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. स्थानिक स्तरावर क्रिकेटला चालना देणे, युवकांमध्ये संघभावना व नेतृत्वगुण विकसित करणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रफुल्ल वाघ, महेश कदम, निलेश पाटील यांच्यासह संपूर्ण आयोजन समिती परिश्रम घेत आहे. मैदानावर प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असून, गोल्फ क्लब परिसरात दररोज क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळत आहे.
नाशिककरांसाठी ‘मराठा प्रीमियर लीग’ ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून, इतिहास, संस्कार आणि क्रीडास्पर्धेचा संगम ठरला आहे. आगामी दोन दिवसांत अंतिम फेरीसाठीची चुरस अधिक रंगण्याची शक्यता आहे.
