स्टेडियम काॅम्प्लेक्समधील तळघर स्वच्छ करण्याच्या पाेलिसांकडून सूचना

रस्ताही हाेणार माेकळा; दाेन्ही तळघरांत मिळून किमान ५०० दुचाकींच्या पार्किंगची साेय हाेणार

या सूचना महत्त्वाच्या:

  • एमजीराेड झेडपी काॅम्प्लेक्सच्या सहापैकी इमारत २ आणि ५ मधील तळघर पार्किंगसाठी स्वच्छ करणे.
  • तेथे प्रकाश याेजना, सुरक्षारक्षक, सूचना फलक बसवणे.
  • प्रत्येकी २५० वाहनांची पार्किंग सुविधा.
  • थांब्यांवरच रिक्षा उभ्या करणे.
  • पाेटभाडेकरू, फलक वा अन्य अतिक्रमण काढा
  • पदपथांवरील विक्रेत्यांना हाॅकर्स झाेनमध्ये स्थलांतरीत व्हा

नाशिक (प्रतिनिधी): एमजीराेडवरील स्टेडियम काॅम्प्लेक्समधील इमारत २ व ५ ची तळघरे आज स्वच्छ करण्यात येणार असून किमान ५०० वाहनांसाठी पार्किंग सुविधा येथे उपलब्ध हाेणार आहे. त्यामुळे येथील पार्किंगचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. दरम्यान व्यावसायिक, विक्रेत्यांसह माॅल्सचालकांनी इमारतींच्या पार्किंगमध्ये ग्राहकांना वाहने उभी करण्यास जागा करून देणे बंधनकारक आहे. तळघरांतील पार्किंगच्या जागेचा वापर गाेदाम म्हणून न करता वाहनतळ म्हणूनच व्हावा, आस्थापनांपुढे अतिक्रमण वा पाेटभाडेकरून ठेवून रस्ता व्यापणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी ताकिद पाेलिस अधिकाऱ्यांनी मुख्य बाजारपेठांतील व्यावसायिक, विक्रेत्यांना दिली आहे. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात मुख्य बाजारपेठ परिसरातील व्यावसायिक प्रतिनिधींसह हाॅकर्स पदाधिकारी, आरटीओ, स्मार्ट सिटी, सिटी लिंक, महापालिका अधिकारी, रिक्षा युनियन तसेच ट्रान्स्पाेर्ट असाेसिएशनचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यात बेशिस्त पार्किंगसह अतिक्रमण, पाेटभाडेकरू, पदपथांवरील विक्रेत्यांचे अतिक्रमण, अनधिकृत रिक्षाथांबे आदी विषयांवर चर्चा झाली. हाॅकर्सच्या सदस्यांसह रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या. बाजारपेठांमध्ये अवजड वाहतुकीमुळे उद‌्भवणाऱ्या समस्येबाबत ट्रान्स्पाेर्ट असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. पाेलिसांनी संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना केल्या. अनेक विक्रेत्यांनी रस्ते, पदपथ व्यापले आहेत तर अनधिकृतपणे ठिकठिकाणी रिक्षाथांबे तयार झाले असून बेशिस्तीमुळे रहदारीला अडथळा हाेत असल्याचे पाेलिसांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पालिकेसह आरटीओ अधिकाऱ्यांनी याप्रश्नी ताेडगा काढण्याची मागणी झाली.

लवकरच उपाययाेजना
पार्किंगविषयी वाहतूक शाखेने सूचना केल्या आहेत. त्यामुळे विक्रेते, व्यावसायिक, रिक्षाचालक, ट्रान्स्पाेर्ट तसेच हाॅकर्सच्या सदस्यांनाही प्रश्न मांडता आले. चर्चेनुसार प्रशासकीय पातळीवरून उपाययाेजना केल्या जातील.
– दिवाणसिंग वसावे, वरिष्ठ निरीक्षक, युनिट २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!