सटाणा (प्रतिनीधी): राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून सुरू करण्यात आलेल्या “गाव भेट समाधान शिबिर” उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथून या शिबिराची दमदार सुरुवात झाली. महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अभियानाच्या टप्पा–१ अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४१ मंडळांमध्ये शिबिरे यशस्वीरीत्या पार पडली असून सुमारे २९ हजार ७४७ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर या शिबिरांचा विस्तार करण्यात येऊन “गाव भेट समाधान शिबिर” गावपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये १५ एप्रिल ते २० मे या कालावधीत शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ठेंगोडा येथे झालेल्या शिबिरास उपविभागीय अधिकारी महेश शेलार, तहसीलदार कैलास चावडे, नायब तहसीलदार रविंद्र पाटील, पूरवठा निरीक्षक विनायक कोळी, गटविकास अधिकारी भैय्या सावंत यांच्यासह महसूल व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात रेशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, विविध दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर, सातबारा उतारे, फेरफार, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा, सामाजिक अर्थसहाय्य योजना, शासकीय विहीर वाटप आदी विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
दरम्यान, ठेंगोडा येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक मोठे यांच्या कार्याचे शेतकरी व नागरिकांनी विशेष कौतुक केले. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाची माहिती उपस्थितांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत पाठ थोपटत गौरव केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हंसराज सोनवणे, चंद्रकांत वाघ, गिरीश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मनोज भामरे व सतीश निकम यांनी केले.
