नाशिक (प्रतिनिधी): नायलाॅन मांजावर बंदी असली तरी शहरात खुलेआम त्याचा वापर केला जात आहे. याच नायलाॅन मांजामुळे एका युवकाचा गळा कापला गेल्याने ताे गंभीर जखमी झाला. तातडीने वैद्यकीय उपचार केल्याने त्यांचा जीव बचावला, मात्र गळ्याला १८ टाके पडले.
या घटनेमुळे नायलाॅन मांज्याची विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. नायलाॅन मांजा जीवघेणा ठरत असल्याने विक्री तसेच वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र केवळ अर्थिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने शहरात छुप्या पध्दतीने नायलाॅन मांजाची विक्री केली जात आहे. रविवारी (दि. ५) लेखानगर परिसरातून दुचाकीवर येत असलेल्या आनंद भाेई रा.काझीगढी, अमरधाम राेड या युवकाचा गळा कापला गेला. गळा कापला गेल्याने भाेई पुर्ण रक्तबंबाळ झाला हाेता. नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तातडीने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नायलाॅन मांजा मुळे नागरिक जखमी हाेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंदी असूनही अशा प्रकारे मांजामुळे नागरिक जखमी हाेत असल्याने प्रशासनासह पाेलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकाराला आळा घालण्यासाठी पाेलिसांनी विशेष तपासणी माेहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
