नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एक कार पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळून दरगोडे कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दरगोडे कुटुंब शिवाजीनगर येथे झालेल्या स्नेहसंमेलनावरून आनंदात घरी परतत होते. मात्र, काही अंतरावरच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्याने आणि अंधारामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अखेर क्रेन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर एकामागून एक मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत ५ लहान मुलांचाही समावेश असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), रेशमा सुनील दरगोडे (३३) यांच्यासह राखी, आशा, माधुरी आणि श्रावणी दरगोडे यांचा समावेश आहे. तसेच अवघ्या ७ ते १६ वयोगटातील सृष्टी (१६), श्रेयश (११) आणि समृद्धी (७) या निरागस मुलांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापही पसरला आहे. रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरींना सुरक्षात्मक भिंत नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. पोलीस पुढील तपास करत असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधले जात आहे.
