जऊळके दिंडोरीत बिबट्याचा शेतकऱ्यावर थरारक हल्ला; वनविभागाकडून तातडीने कारवाई

ओझर (प्रतिनिधी) : दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथील जऊळके फाटा परिसरात मुंबई–आग्रा महामार्गालगत असलेल्या शेतात बुधवारी सकाळच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तानाजी खंडेराव जोंधळे (वय ४४) हे आपल्या गव्हाच्या शेताला पाणी देत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जोंधळे हे शेतात खाली वाकून पाणी देण्याचे काम करत असताना बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षण काय घडते आहे हेच समजले नाही. मात्र प्रसंगावधान राखत जोंधळे यांनी प्रतिकार केला. बिबट्याशी झालेल्या झटापटीत त्यांना पाठ, मांडी व छातीवर गंभीर जखमा झाल्या. बिबट्याचे दात व नखांनी ओरखडे बसल्याने ते रक्तबंबाळ झाले.

दरम्यान, शेजारील शेतात असलेल्या त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढत जवळील मका व ऊसाच्या शेतात धूम ठोकली. या आवाजामुळे परिसरातील शेतकरीही घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेतील जोंधळे यांना नातेवाईक तसेच ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागुल व शाम गांगुर्डे यांनी तत्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्राधिकारी (प्रा.) सुशांत पाटील, वनपाल उमराळे, भटू बागुल, वनरक्षक योगेश दळवी, निलेश भोये व गोरख गांगोडे यांनी रुग्णालयात भेट देऊन जोंधळे यांची विचारपूस केली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्थानिक शेतकरी हनुमान जोंधळे यांनी ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशन संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी सदस्य हेमंत वानले, किरण पल्हाळ व चिरंजीवी तुसे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली तपासणी केली. बिबट्या जवळील मका अथवा ऊसाच्या दाट शेतात लपून बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाने दोन पिंजरे लावले असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

वनविभाग व ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशनच्या वतीने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. शेतात एकटे न जाणे, सायंकाळी व पहाटे दाट पिकांच्या शेतात सावधगिरी बाळगणे, मोबाईल किंवा टॉर्च जवळ ठेवणे, समूहाने काम करणे अशा उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यासोबतच बिबट्याबाबत माहितीपत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. या घटनेमुळे जऊळके दिंडोरी परिसरात भीतीचे वातावरण असून, बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई सुरू ठेवली आहे.

“गावात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेऊन महिनाभरापूर्वी मानव–बिबट सहजीवन जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली आहे. यापुढेही असे कार्यक्रम सातत्याने राबविणार आहोत.”
– कुणाल बागुल, ग्रामपंचायत सदस्य, जऊळके दिंडोरी

“शेतकऱ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या पाहणीनंतर दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजीपूर्वक वागावे.”
तुकाराम जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!