सिंहस्थ पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासाला वेग; त्र्यंबकेश्वर–सप्तशृंगगडासाठी कोट्यवधींचा निधी

नाशिक (प्रतिनिधी) : आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात धार्मिक व नैसर्गिक पर्यटन विकासाला मोठी गती मिळाली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी गड येथे राज्याच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून पायाभूत सुविधा उभारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वरसाठी २७५ कोटी रुपयांचा सर्वंकष विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून रस्ते सुधारणा, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच भाविकांसाठी निवारा केंद्र उभारणीस प्राधान्य दिले जाणार आहे.

दरम्यान, सप्तशृंगगडासाठी ८१ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली असून, त्यापैकी ५६ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. गड परिसरातील पायऱ्यांची दुरुस्ती, सुरक्षा उपाययोजना, दर्शन रांग व्यवस्थापन, स्वच्छता सुविधा आणि परिसर सुशोभीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

धार्मिक पर्यटनाबरोबरच नैसर्गिक पर्यटनालाही चालना देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. येवला येथे जंगल सफारी प्रकल्प प्रस्तावित असून, गंगापूर धरण आणि नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात ‘आयलंड टुरिझम’ संकल्पना विकसित करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. या प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. याशिवाय वनपर्यटनासाठी २४ लाख ९० हजार रुपये आणि पर्यटनस्थळी मूलभूत सोयी-सुविधांसाठी ४३ लाख ८६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थ पर्व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तसेच भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!