पोलिसांकडून संशयित ताब्यात; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन!
नाशिक (प्रतिनिधी):अल्पवयीन मुलाने महिलेची छेड काढल्याची घटना भारतनगर परिसरात घडली. मात्र, या घटनेनंतर एका समाजातील तरुणाने दुसऱ्या समाजातील महिलेसह लहान मुलीची छेड काढल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि मुंबईनाका पाेलिस ठाण्याबाहेर नागरिकांनी माेठ्या संख्येने गर्दी केली. यामुळे ७.३० वाजेपासून ९.४० पर्यंत तणाव निर्माण हाेऊन मुख्य चाैकात वाहतूक काेंडीही झाली. पाेलिसांनी नागरिकांची समजूत काढत संयशयित अल्पवयीनास ताब्यात घेतले. यानंतर तणाव निवळला.
मुंबईनाका पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने शेजारील महिलेच्या घरात शिरून विनयभंग केला. या प्रकाराने महिलेसह तिची लहान मुलगीही भेदरली. महिलेने आरडाओरड करताच संशयिताने पळ काढला. मात्र, संबंधित महिलेने नागरिकांसमवेत मुंबईनाका पाेलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. यादरम्यान काही नागरिकांनी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची अफवा पसरवल्याने दाेन धर्मीय समाजातील नागरिकांनी काही मिनिटांत पाेलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. यामुळे तणाव निर्माण झाला. पाेलिसांनी लागलीच संशयिताचा शाेध घेत ताब्यात घेतले. तसेच घडलेल्या घटनेबाबत जमावाला माहिती देत समजूत काढल्याने रात्री १० वाजेपर्यंत तणाव निवळला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते.
