नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एन डी सी सी) नोकरीचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आशिष केशव बनकर (रा. द्वारका, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०१६ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान बँकेचे संचालक परवेज मोहम्मद युसुफ कोकणी, विभागीय अधिकारी भास्कर शंकर बोराडे, आणि पीए मोबीन सलीम मिर्झा यांनी संगनमत केले. त्यांनी बनकर यांना क्लर्क पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून रोख १५ लाख रुपये घेतले.
आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रे दाखवली. मात्र, नोकरी न मिळाल्याने बनकर यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर पुढील तपास करत आहेत.
