सिन्नर (प्रतिनिधी): सिन्नर बस स्थानकात सकाळी ११ च्या सुमारास सिन्नर-देवपूर बस (एमएच १३ सीयू ८२६७) डेपोतून फलाट क्र. १० वर येत असताना थेट फलाटावर चढली. यावेळी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची फलाटावर गर्दी होती. त्यातच पंढरपूरहून दर्शन घेऊन परतलेले आणि गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेले बोराडे कुटुंबीयही होते. बस थेट स्थानकात शिरल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. या घटनेत आदर्श बोराडेसह अन्य चार जण जखमी झाले. आदर्शला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
आदर्शच्या मृत्यूने दापूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
डेपोतून आलेल्या एसटी महामंडळाच्या बसने फलाटावर उभ्या असलेल्या पाच प्रवाशांना चिरडल्याची घटना सिन्नर बस स्थानकावर बुधवारी (दि. १९) सकाळी घडली. या अपघातात आदर्श योगेश बोराडे (वय ९, रा. दापूर, ता. सिन्नर) या तिसरीत शिकणा-या बालकाचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर संतप्त प्रवाशांनी रास्ता रोको आंदोलन करत दोषीवर कारवाईची मागणी केली. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मे महिन्यात कोसळला होता याच बस स्थानाकाचा स्लॅब
याच वर्षी २५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे याच सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. यात शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, जीवितहानी टळली होती. तेव्हा देखील सिन्नरचे हे बस स्थानक चर्चेत आले होते.
