तपोवनात साधुग्रामसाठी २८०.४६ एकर व संलग्न सुविधांसाठी ९७.०५ एकर जागा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. ९४.०७ एकर महापालिकेने ताब्यात घेतली आहे. २८३ एकर क्षेत्र संपादन करणे बाकी आहे. १३ एकर क्षेत्रात जनार्दन स्वामी मठ व लक्ष्मीनारायण मंदिराची लक्ष्मी गोशाळा आहे. दीड एकर क्षेत्रात अभिन्यास मंजूर आहे. २६८ एकर जागा संपादीत केली जाणार आहे.
नाशिक (प्रतिनिधी): प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी झालेली गर्दी पाहता नाशिकमध्ये सिंहस्थासाठी किमान पाच ते दहा कोटी भाविक, साधु-महंत येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार, तयारी व व्यवस्थापन तसेच सोयी-सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये साधुग्रामसाठी किमान एक हजार एकर जागा संपादित करणे आवश्यक आहे. महापालिकेने ९३ एकर जागा आधीच संपादीत केली आहे. अद्यापही २८३ एकर जागा संपादन करणे बाकी आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसाठी १२०० एकर जागा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली. या घोषणेनुसार जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी जागा भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी पुन्हा संवाद सुरू केला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात तपोवनातील २६८ जागा संपादीत करण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती गुरुवारी (दि. २०) शेतकºयांसोबत वाटाघाटी करणार आहेत. दरम्यान, मनपाने भूसंपादनाकरीता पाच फॉर्म्युले तयार केले असून, ते शेतकऱ्यांसमोर सादर केले जाणार आहेत.
सध्या प्रशासनापुढे संबंधित जागा कायमस्वरूपी संपादीत करणे किंवा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जमीन अधिग्रहीत करणे, असे दोनच प्रस्ताव आहेत. मनपाकडे भूसंपादनासाठी निधी नसल्यामुळे जागा ताब्यात घेण्यासाठी पाच प्रकारचे फॉर्मुले तयार करण्यात आले होते. मुख्यमंत्री कार्यालयात बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाडेतत्वाऐवजी कायमस्वरुपी जागा टप्प्या टप्प्याने भूसंपादीत करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व जागा ताब्यात घेण्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी लागत असल्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने ५० टक्के रोख मोबदला आणि ५० टक्के टीडीआरचा प्रस्ताव दिला होता. तरीही दोन हजार कोटींची आवश्यकता आहे. त्यानुसार चार टप्प्यात पैसे देण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी आता थेट शेतकºयांसोबत भूसंपादनाबाबत वाटाघाटी केल्या जाणार आहेत.
