नगरसेवकांच्या २६६ जागांसाठी १३४४ उमेदवारांचे अर्ज वैध तर जिल्ह्यात १०६ उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी रिंगणात!

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. तब्बल आठ वर्षांनी निवडणुका होत असल्याने यंदा इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. अर्ज दाखल करायच्या अंतिम दिवसापर्यंत प्रशासनाकडे नगराध्यक्षाच्या अकरा जागांसाठी एकूण १५४ तसेच नगरपालिकांच्या २६६ जागांकरिता १ हजार ८२१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. मंगळवारी (दि. १८) दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये नगराध्यक्षांचे ४८ अर्ज बाद ठरले असून, नगरसेवक पदाचे ४७७ अर्ज बाद ठरले. नगराध्यक्षाचे चांदवडला सर्वाधिक १७ अर्ज बाद झाले. त्याखालोखाल पिंपळगाव बसवंतला ८ अर्ज बाद करण्यात आले. छाननीनंतर अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून, शुक्रवारी (दि.२१) दुपारी तीनपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आता माघारीकडे लागून राहिले आहे. जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकीत अर्ज छाननीनंतर थेट नगराध्यक्षपदासाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकांच्या २६६ जागांसाठी १३४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

अकराही नगरपालिकांमध्ये नगरसेवक पदाचे एकूण ४७७ अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये पिंपळगावला सर्वात जास्त ८० अर्ज बाद ठरले, तसेच भगूरमध्ये ७५, चांदवड ७२, सिन्नर ६४, मनमाड ५३, सटाणा ४०, ओझर ३२, येवला २८, त्र्यंबकेश्‍वर १६, नांदगाव १४, तर इगतपुरीमध्ये तीन अर्ज बाद ठरले. अर्ज छाननीनंतर आता माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२१) माघारीची मुदत आहे. त्यामुळे माघारीनंतर खऱ्या अर्थाने लढतींचे चित्र स्पष्ट होणार असल्याने जिल्हावासीयांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

वैध ठरलेले अर्ज
नगरपालिका नगराध्यक्ष सदस्य
इगतपुरी ०४ ७७
नांदगाव ०७ ६६
भगूर ०५ ६७
ओझर १६ १७४
त्र्यंबकेश्‍वर ०९ ९०
पिंपळगाव बंसवंत ०५ ८५
मनमाड १४ २५०
येवला १० १२४
सिन्नर ०९ १५३
सटाणा ०८ १०१
चांदवड १९ १५७
एकूण १०६ १३४४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!