कृष्णा पैठणे,
वणी (प्रतिनिधी): मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला वणी येथील जगदंबा माता मंदिरात शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी (साकुरी शिव) व जगदंबा देवी विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ हजार १ इतके दिवे प्रज्वलीत करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यामुळे एवढ्या थंडीतही वणीसह पंचक्रोशितील भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला होता.
शिर्डी (साकुरी शिव) येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळ वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तश्रृंगी गड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा पदयात्रेचे २६ वे वर्ष आहे तर दिपोत्सवाचे हे १४ वे वर्ष आहे. दरवर्षी मकर संक्रातीला पदयात्रेकरु सप्तश्रृंगी गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात. सुरुवातीला ८ पदयात्रेकरुंनी सुरु झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून या वर्षी पावणे दोणशे भाविक सहभागी झाले आहे.
गेल्या चौदा वर्षांपासून सप्तशृंगी मातेचे मुळ रुप समजल्या जाणाऱ्या वणी येथील जगदंबा माता मंदीर प्रांगणात विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने भोगीच्या दिवशी सायंकाळी दिपोत्सव आयोजित केला जात आहे. तसेच या उत्सवात दरवर्षी १ हजार दिव्यांची वाढ केली जाते. या वर्षी एकुण १६ हजार दिवे प्रज्वलित करण्यात येऊन हा दिपोत्सव साजरा करण्यात आला. आज दि.१३ रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास जगदंबा मातेची आरती सुरु होताच शिवशक्ती मित्र मंडळ, देवी मंदिर ट्रस्टीचे सदस्य व वणी गाव व पंचक्रोशितील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत शिस्तबद्द नियोजन करीत पणत्या प्रज्वतील करण्यास सुरुवात करुन आरती संपेपर्यंत जगदंबा देवी मंदीर व परीसरात
१६ हजार १ पणत्या पेटवून दिपोत्सव साजरा केला. यावेळी देवीच्या मंदीरासह देवीसमोरील सभामंडप, परिसरातील झाडे व पाण्याचे तीनही तलाव नेत्रदिपक दिपोत्सवाने उजळुन निघाले होते. दिपोत्सव बघण्यासाठी वणीकरांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. हजारो दिव्यांच्या लखलखटाने व्यापलेला परिसातील विहंगमय दृष्य भाविंकाना सेल्फी घेण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसत होते. या अर्ध्या तासांच्या दिपोत्सवानंतर झी टॉकिज फेम समाज प्रभोदनकार ह.भ.प.दत्ता महाराज वैद्य निफाडकर यांचे प्रवचनाचे आयोजन केलेले करण्यात आले होते.
तर सदर उत्सव यसस्वीतेसाठी सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणी, शिवशक्ती मित्रमंडळ, साकुरी तसेच वणीसह पंचक्रोशितील भाविकांनी परिश्रम घेतले.
