नाशिक (प्रतिनिधी) : नवीन वर्ष स्वागत जल्लोषात अवघे ५५ तळीराम पोलिसांच्या हाती लागले. तळीरामांचा उपद्रव टाळण्यासाठी व कायदा व्यवस्थेसह अपघात टाळण्यासाठी अवघे पोलीस दल रस्त्यावर उतरले होते. शहर परिसरातील मुख्य मार्गांसह गल्लीबोळात नाकाबंदी व स्टॉप अॅण्ड सर्च मोहीम, तसेच वाहन तपासणी करीत पोलिसांनी ही कारवाई केली.
नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकांच्या उत्साहाला उधान येते. बहुतांश लोकांकडून ओल्या पार्ट्यांसह मांसाहारी जेवणाचा बेत आखला जातो. यासाठी शहर तसेच शहरानजीक असलेल्या लहान-मोठ्या हॉटेलची निवड करण्यात येते. यंदाही शहरासह शहराबाहेरील हॉटेल्स हाउस फुल्ल होते. चिअर्स म्हणत मद्याचे पेले रिचवत वाहन चालवणाºयांमुळे कुठलाही अपघात किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल, अशी कृती होऊ नये, यासाठी पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले होते.
शहर परिसरात पोलीस ठाणेनिहाय परिसरातील मुख्य रस्ते, चौफुली या ठिकाणी नाकाबंदी करत शेकडोहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. अल्को मीटरच्या माध्यमातून वाहनचालकांनी मद्यपान केले की नाही, याची तपासणी सुरू राहिली, तसेच वेगात वाहन चालवणारे, वाहनांवर ट्रीपल सीट जाणारे आदींवर कारवाई करण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस ठाणेनिहाय ७३ ठिकाणी स्टॉप अॅण्ड सर्च पॉइंटवर बंदोबस्त तैनात करण्यात आला. ३९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात पाच वाहने गस्तीसाठी अशी ७० वाहने तैनात करण्यात आली होती. मद्यपान करून वाहन चालविणा-या ५५ तळीरामांवर बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचा-यांनी कारवाई केली.
अंबड, इंदिरानगरला अडीच लाखांचा दंड वसूलपोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरून मद्य प्राशन करून वाहन चालविणा-यांना जोरदार झटका दिला आहे. यामध्ये पोलिसांनी त्या मद्यपी वाहन चालकांकडून सुमारे दोन लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल केला. परिसरात सुमारे १९० तपासणी नाके बनविण्यात आले होते. यामध्ये ३० अधिकारी, ९० अंमलदार, होमगार्ड रस्त्यावर थांबून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत खबरदारी घेत होते.
यावेळी मद्य प्राशन करून वाहन चालविणाºयांवर इंदिरानगर परिसरात पोलिसांच्या वतीने सर्वाधिक अठरा मद्यपींवर कार्यवाही करण्यात आली, तर अंबड पोलीस ठाणे व अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीच्या अंतर्गत प्रत्येकी तीन तीन कार्यवाही करण्यात आल्या, तर वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने केवळ दोन कार्यवाही करण्यात आल्या आहेत. ही कार्यवाही अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, इंदिरानगरचे रामदास शेळके, तर चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी निरीक्षक मनोहर कारंडे व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
