नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथील चार्टर्ड अकाउंटंट व सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष एम. वाय. सरोदे यांचे पुतण्या आदित्य सरोदे यांनी खडतर परिस्थितीवर मात करून सीए पदवी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. आदित्यने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इच्छा शक्ती व अथक परिश्रम घेत हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाला असून यामध्ये आदित्य सरोदे याने सीए फायनल या परीक्षेत एक एक ग्रुप ची परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.
कोरोना काळात वडिलांचे छत्र हरपल्याने आत्मविश्वास खचून नैराश्य आले होते यामुळे सीए परीक्षेकडे दुर्लक्ष झाले होते. या काळात काकांनी व आईने धीर देत पुन्हा मनोबल वाढवले त्यांचे मार्गदर्शन व सपोर्ट मुळे पुन्हा सीए चा अभ्यास सुरू केला. परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे सुव्यवस्थित नियोजन केले केवळ ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून ही परीक्षा उत्तीर्ण केल्याचे आदित्यने सांगितले. याप्रसंगी विजय महाले यांनी आदित्य सरोदे यांचा सत्कार करत अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.