नाशिक (प्रतिनिधी): विभागीय आयुक्त कार्यालयात रेशन धान्य दुकानाच्या संदर्भातील अपिलाचा निकाल बचत गटाच्या बाजूने लागला. मात्र, या आदेशाच्या निकालाची प्रत देण्यासाठी १५ हजारांची लाच मागून तडजोडी अंती १० हजार रुपयांची रक्कम लाच स्वरुपात स्वीकारणा-या संशयित विभागीय तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत केदारे( वय ५७) यांना एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि.24) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.
एसीबीच्या अधिक-यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाच्या पत्नी या महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक यांचेमार्फ त स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे, त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे अपील सुरू होते. या अपिलाचा निकाल हा तक्रारदार यांच्या वहीनीच्या बचत गटाच्या बाजूने लागला. मात्र, यासंबंधिच्या आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता संशयित लोकसेवक केदारे यांनी मंगळवारी (दि.२४) पंचासमक्ष १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १० हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदारांचा समक्ष स्वीकारली. यावेळी त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे.