नाशिक (प्रतिनिधी): बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर संशयास्पद आहे. त्याच्या तोंडावर बुरखा आणि हातात बेड्या आहेत. मग तो बंदूक घेऊन गोळ्या कसा चालवतो, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जनतेसमोर सत्य यायला हवे, अशी मागणी करीत राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
नाशिक दौºयावर असताना खा. राऊत यांनी मंगळवारी (दि. २४) माध्यमांसोबत संवाद साधला. स्वच्छतेचे काम करणाºया या मुलाला गोळ्या चालवायचे ट्रेनिंग कुणी दिले, असा सवाल उपस्थित क रत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
मुंबई किंवा देशभरातील कुठलेही एन्काउंटर कधीही खरे नसते. त्यात काहीतरी रहस्य असते. काहीतरी संपवायचे असते. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत. भाजपशी संबंधित संस्थाचालकांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केले. संस्थाचालक दोषी नसेल, तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केले, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही राऊत यांनी केली. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी बदलापुरातील जनता आरोपीला आमच्या ताब्यात द्या, म्हणत रस्त्यावर उतरली होती. त्यांनी रेल्वे बंद पाडली, रस्ते ब्लॉक केले, मंत्र्यांना परत पाठवले होते. आम्हाला आरोपी हातात द्या, आम्ही त्याला फासावर लटकवू किंवा शिक्षा देऊ, अशी लोकांची मागणी होती. तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आम्ही फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवू, असे आश्वासन दिले होते. त्या अश्वासनाचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
… तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा
महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी जे वातावरण निर्माण केले आहे, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे केले आहे का, अशी शंका उपस्थित करीत, हे साधे प्रकरण नसल्याचे राऊत यांनी यावेळी सांगीतले. ज्याचा खटला तुम्ही फास्टट्रॅक कोर्टात चालवणार आहात आणि त्याला फाशी देणार आहात, त्याचे तातडीने एन्काउंटर करण्याची गरज का पडली, याचे उत्तर द्यावे. कोणी पळून जात नव्हते. पोलीस व्हॅनमध्ये बेड्यांनी जखडलेला आणि बुरखा असलेला गुन्हेगार पोलीस अधिकाºयाच्या कमरेवरील पिस्तूल कसे काढेल? एवढेच आमचे पोलीस लेचेपेचे असतील, तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.