नाशिक (प्रतिनिधी): राज्याच्या विविध भागातील ४१० पुरुष व २१० महिला पोलिस उपनिरीक्षक पोलिस दलामध्ये समाविष्ठ झाले. पदाचे मूल्य जपून ‘पीडितांचे संरक्षण अन् दृष्टांचा नाश’ करण्याची शपथ अवघ्या २९ वर्षे वयाच्या आतील पोलिस उपनिरीक्षकांनी सेवेत दाखल होताना घेतली. ‘सद रक्षणाय, खल निग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला साद घालत १२४व्या बॅचच्या ६२० पोलिस उपनिरीक्षकांनी बारा महिन्यांचे आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचा दीक्षांत समारंभ येथील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीत शुक्रवारी (दि. २०) पार पडला.
पोटचा गोळा खाकी वर्दीतला अधिकारी झाल्याचा सर्वोच्चक्षण पाहून पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसले. दीक्षांत सोहळ्याला सकाळी ८:०० वाजता प्रारंभ झाला. हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश दौलतराम जगमलानी मुख्य अतिथी होते. प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांचे परेड संचलन झाले. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून प्रशिक्षणार्थीनी उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. खडतर प्रशिक्षण घेत या प्रशिक्षणार्थीनी पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. संचलनाचे नेतृत्व सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी नेहा दिलीप कोंडेकर यांनी केले. मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या तुकडीकडून स्वीकारली. मानवंदना अकादमीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवाल वाचन केले. ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलिस उपसंचालक (बाह्यवर्ग) संजय बारकुंड, अनिता पाटील, डॉ. काकासाहेब डोळे, प्रदीप जाधव यांच्यासह महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे सर्व अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थीचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.