नाशिक (प्रतिनिधी): गेल्या पाच दिवसांत शहरात तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसने घसरला आहे. सोमवारी (दि. २१) किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअसवर असलेले तापमान रविवारी (दि. २७) किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लाल्यानंतर पावसाची उघडीप होताच आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. शहर व जिल्ह्यात दिवसा कडक ऊन आणि सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे कडाक्याचा हिवाळा राहणार, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यात आतापासून थंडी अनुभवायला येऊ लागली आहे. कमाल तापमान ३३ अंशांपर्यंत जात असून किमान तापमानातही घसरण होत आहे. दिवसाच्या वेळी प्रखर सूर्यकिरणांमुळे तप्त उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. सूर्यास्तानंतर वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात होत आहे. रविवारी (दि. २७) नाशिकचे कमाल तापमान ३२.९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. त्यात सोमवारी (दि.२८) वाढ होऊन ते ३४.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वातावरणात गारवा जाणवत असून तापमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण होते आहे. मागील बुधवारी (दि.२३) नाशिक शहराचे किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस नोंदविले होते. त्यामध्ये जवळपास पाच अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. सोमवारी किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.