नाशिक (प्रतिनीधी): वसूबारस, धनत्रयोदशी व नरक चतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजन साजरे होत आहे. गुरुवारी (दि. ३१) दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी अमावास्या सुरू होते. ही अमावास्या शुक्रवारी सायंकाळी ६.१६ मिनिटांपर्यंत आहे. अमावास्या जरी गुरुवारी सुरू होत असली, तरी लक्ष्मीपूजन शुक्रवारीच करावे, असे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वत्र दुकाने, कार्यालये, संस्था आणि घरोघरी शुक्रवारीच लक्ष्मीपूजन केले जाईल. नागरिकांनी बाजारात जाऊन लक्ष्मीपूजनाचे सर्व साहित्य खरेदी केलेले आहे.
प्रकाश, आनंद अन् नवचैतन्य घेऊन आलेल्या दीपोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. खरेदीसाठी बाजारात अलोट गर्दी उसळली असून, घरोघरी रुचकर फराळाचा सुगंध दरवळत आहे. या उत्साहपुर्ण वातावरणात शुक्रवारी (दि.१) घरोघरी लक्ष्मीपूजन होणार आहे. त्यासाठी पुर्वसंध्येला नाशिककरांनी पुजेचे साहित्य, पणत्या, आकाशकंदिल, फटाके, कपड्यांसह घरगुती वस्तूंची खरेदी केली. याशिवाय बांधकाम, वाहन आणि सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली.
लक्ष्मीपूजनानिमित्त लागणाºया विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरांवर आकाश कंदिलांचा मंद प्रकाश आणि जोडीला फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळणार आहे.
शहरातील रविवार कारंजा, पंचवटी, रामघाट, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड, शालिमार, कॉलेज रोड, गंगापूर रोड, सिडको, नाशिकरोड अशा प्रमुख ठिकाणी लाह्या बत्तासे, फुले, हार, लक्ष्मीची मूर्ती, फोटो, पाच फळे आदी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी गेल्या काही दिवसांपासून गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे रूप म्हणून केरसुणीची पूजा केली जाते. नायलॉन केरसुणी व फड केरसुणी (शिंदीच्या झाडाची) अशा दोन प्रकारच्या केरसुणी बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध असून, त्याला ग्राहकांची चांगली मागणी होती. लक्ष्मीच्या मूर्तीची किंमत ८० रुपयांपासून, तर नायलॉन केरसुणी ८० ते ९० रुपये जोडी, फड केरसुणी ५० ते १२० रुपये जोडी या दराने विकण्यात येत होती. छोट्या आकाराच्या लक्ष्मी (केरसुणी) २० रुपयांपासून विक्री होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते.
दसऱ्याप्रमाणेच दिवाळीतही फुलांची आवक कमी होत असल्यामुळे या दिवाळीला ग्राहकांना फुलांसाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. गुरुवारी (दि़११) सायंकाळपर्यंत झेंडूच्या फुलांचे दर १०० ते २०० रुपये शेकडा असे होते. फुलांच्या माळाही २५ ते २०० रुपयांपर्यंत आकारानुसार मिळत होत्या. याशिवाय गुलाब फुलांचे गुच्छही १०० रुपयांपेक्षा अधिक दराने विकले गेले. शेवंतीच्या फुलांचे दर ५०० रुपये किलोने विकले गेले. दसऱ्यानंतर दिवाळीतही फूल उत्पादकांना चांगला दर मिळाला. या निमित्ताने त्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
