नाशिक (प्रतिनीधी): निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार २९ ऑक्टोंबरपर्यंत उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची अंतिम मुदत होती. ३० ऑक्टोंबर रोजी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. माघारीसाठी अंतिम मुदत ४ नोव्हेंबर आहे. यादिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर नामनिर्देशनपत्रांच्या छाननी प्रक्रियेत अर्ज वैध ठरल्यावर संबंधित उमेदवार निवडणुकीसाठी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार बनतात. मात्र, उमेदवारास निवडणुकीच्या लढतीतून माघार घेण्याची इच्छा असल्यास उमेदवारी अर्ज माघारी घेता येतो.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ३६१ उमेदवारांनी ५०६ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली आहेत. त्यानुसार, एका जागेसाठी सरासरी २४ इच्छुक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील काही बंडखोरांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने निवडणुकीत चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या तीन दिवसात बंडोबांना थंड करण्यातच पक्षश्रेष्ठींची दिवाळी जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात एकुण ३६१ उमेदवार; बंडखोरांना थंड करण्यातच जाणार पक्षश्रेष्ठींची दिवाळी
