सटाणा नगरपालिकेत भाजपला अनपेक्षित धक्का!

थेट नगराध्यक्षपदी शिंदे गटाच्या हर्षदा पाटील यांचा ऐतिहासिक विजय

तुषार रौंदळ, सटाणा (प्रतिनिधी): सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षाविरुद्ध निकाल लागून शहराच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. महायुतीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून पूर्ण ताकद पणाला लावली होती. राज्यातील सत्तेचा प्रभाव, मंत्री-आमदारांचे दौरे, ‘लाडकी बहिण’ योजनेसह विविध विकासकामांचा प्रचार करून भाजपने सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांनी सत्ताधाऱ्यांना धक्का देत परिवर्तनाचा कौल दिला. थेट नगराध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवार सौ. हर्षदा राहुल पाटील यांनी भाजपच्या उमेदवार योगिता मोरे यांचा तब्बल २,९३४ मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या निकालामुळे भाजप व महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला असून आमदार दिलीप बोरसे यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रचारात ताकद, निकालात धक्का: महायुतीच्या नेत्यांनी सटाणा नगरपालिका “पिंजून” काढली होती. प्रत्येक प्रभागात सभा, बैठकांचा धडाका, कार्यकर्त्यांचे जाळे आणि सत्तेचा प्रभाव वापरण्यात आला. भाजपला नगरसेवक पदावर मोठे यश मिळाले असले तरी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मात्र भाजपचा डाव फसला.

भाजपाचे १५ नगरसेवक निवडून आले, तरी नगराध्यक्ष पद भाजपकडे न आल्याने “गड आला, पण सिंह गेला” अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मतमोजणीचा थरार: दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर दि. २१ रोजी लोकनेते पं. धं. पाटील मराठा हायस्कूल येथे सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. १२ टेबलांवर १२ प्रभागनिहाय मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच हर्षदा पाटील यांनी योगिता मोरे यांच्यावर आघाडी घेतली. प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढत गेली आणि चौथ्या फेरीअखेर निकाल स्पष्ट झाला. अखेर २,९३४ मतांची निर्णायक आघाडी घेत शिंदे गटाने भाजपचा सपशेल पराभव केला.


अंतिम जागावाटप

  • भारतीय जनता पक्ष – १५ जागा

  • शिवसेना (शिंदे गट) – ४ जागा

  • अपक्ष – ४ जागा

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले असून उर्वरित ११ जागांवर दारुण पराभव सहन करावा लागला आहे.

बंडखोर अपक्ष ठरले निर्णायक: या निवडणुकीत भाजपातील अंतर्गत नाराजी स्पष्टपणे समोर आली. भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार मंगेश खैरणारअलका माळी यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून विजय मिळवला.

तसेच भाजपाने ज्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता असे मंगेश खैरणार, तनुजा नांद्रे व अॅड. मनिषा पवार यांनीही विजय संपादन केला. या बंडखोरीचा थेट फटका भाजपाला बसल्याचे चित्र असून अन्यथा निकाल वेगळा लागला असता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ऐतिहासिक क्षण : पहिली महिला, सर्वात कमी वयाची नगराध्यक्षा:

सटाणा नगरपरिषदेच्या इतिहासात थेट नगराध्यक्षपदी निवडून येणाऱ्या पहिल्या महिला तसेच सर्वाधिक कमी वयाच्या नगराध्यक्षा होण्याचा मान सौ. हर्षदा राहुल पाटील यांनी मिळवला आहे. हा विजय केवळ राजकीय नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे.

पती-पत्नींच्या राजकीय लढतीची चर्चा: या निवडणुकीत पती-पत्नींच्या राजकीय लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. भाजपच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता मोरे व त्यांचे पती, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे या दांपत्याला पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, शिंदे गटाच्या उमेदवार हर्षदा पाटील व त्यांचे पती, माजी नगरसेवक राहुल पाटील या पती-पत्नीने विजय संपादन करत सटाण्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे.

बदलाचा कौल : एकूणच सटाणा नगरपालिकेच्या निकालाने मतदारांनी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला असून आगामी स्थानिक राजकारणावर या निकालाचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!