लक्ष्मण सोनवणे,
बेलगाव कुऱ्हे (प्रतिनिधी): शेती करतांना तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या अपघातग्रस्त कुटुंबियांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह सानुग्रह योजना लाभदायक ठरत आहे. इगतपुरी, नाशिक तालुक्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना लाभ मिळाल्याने त्यांनी शासनाचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो यामुळे कुटुंबाचे आर्थिक साधन बंद होते.
अशा अपघातग्रस्त शेतकरी त्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने अपघातग्रस्त कुटुंबियांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. कृषी विभागाचे मंडळ कृषिअधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरोघरी जाऊन माहिती देतात तसेच शेतीशाळा इतरही कार्यक्रमात योजनेविषयी मार्गदर्शन करीत असल्याने लाभार्थी वारसांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबाला दोन लाखांची आर्थिक मदत केली जाते. नाशिक तालुक्यात २०२३/२०२४ मध्ये १६ प्रकरणे सादर केली होती ती मंजूर असून गेल्यावर्षी १५ प्रकरणे मंजूर झाले असून एक प्रकरण नामंजूर करण्यात आले. दोन वर्षाचे वारसांना एकूण ५९ लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. योजनेसाठी शेतकऱ्यांनी कुटुंबातील सदस्याचा अपघात झाल्यास वारसांनी ३० दिवसांच्या आत प्रकरणे सादर करणे गरजेचे आहे. योजनेसाठी सातबारा, खाते उतारा, आधारकार्ड, मृत्यू दाखला अथवा अपंगत्व दाखला, फेरफार नोंद , वारसनोंद, प्रथम खबरनोंद, मरणोत्तर पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, वारसाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्र आवश्यक असून कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिकच्या तालुका कृषिअधिकारी क्रांती जाधव, कृषी पर्यवेक्षक संजय भांड यांनी केले आहे.
