सटाणा (प्रतिनिधी): बालसंगोपन योजनेत एकल पालक असलेल्या मुला मुलींना दर महिन्याला २२५० रू मिळतात. त्या करिता इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते. या योजनेत आजपर्यंत ११०० रुपये मिळत होते. ते १ एप्रिल पासून २२५० रू मिळणार आहेत. तेव्हा आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
“अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्र अर्जा सोबत पालकाचे व बालकाचे आधारकार्ड, मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला, पालकाचा रहिवासी दाखला, मुलांचे बैंक पासबुक व ते नसल्यास पालकांचे पासबुक, मृत्यूचा अहवाल – (कोविडने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल), रेशनकार्ड, घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो), मुलांचे ३ पासपोर्ट फोटो आदी कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.”
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना ही योजना मिळते. अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानाही प्रत्येकी २२५० रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही लाभ मिळतो. कारण त्या एकल महिला असल्याने नक्की लाभ मिळतो फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करणे गरजेचे आहे. अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समिती समोर सोबत मुलांना नेऊन फॉर्म जमा करावा लागणार आहे.
“योजनेच्या लाभासाठी दलालामार्फत जाण्याची गरज नाही – आकाश साळुंके
बाल संगोपन योजनेत एकल पालक असलेल्या मुलामुलींना २२५० रुपये मिळणार आहेत. योजनेच्या लाभासाठी कोणत्याही दलालामार्फत जाण्याची गरज नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश साळुंके यांनी दिली आहे.”
