नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढला आहे. एकीकडे पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे तापमानात वाढ अशी बिकट स्थिती असताना रविवारी नाशिक शहरासह ग्रामीण भागात वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे उष्म्यातदेखील वाढ झाली. सोमवारी (दि. ३१) जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस येण्याची शक्यता असल्याने शेतक-यांनो सावध व्हा!
रविवारी (दि. ३०) शहरासह ग्रामीण भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सोमवारी (दि. ३१) नाशिकसह काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे सोंगणी करून ठेवलेला गहू, उन्हाळ कांदा झाकण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू झाली असून, अवकाळी बरसल्यास द्राक्षबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, काढणीस आलेला गहू, काढून ठेवलेला शेतातील कांदा, कांदा डेंगळे यासह इतर पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. नाशिकसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक दिसत आहे. उन्हाचा चटका असह्य झाला आहे. संपूर्ण विदर्भात ४० अंशांच्या पुढे तापमान नोंदवले जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानाचा पारा ३८- ४० अंशांदरम्यान आहे. दरम्यान, भारतीय हवामान केंद्राने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
