नाशिक (प्रतिनिधी): गुढीपाडवा हा नूतन मराठी वर्षाचा पहिला दिवस… हा दिवस शुभ मानला जात असल्याने गुढीपाडव्याला अनेक प्रकारच्या नवीन कामांना सुरुवात करण्यात येते. त्यानुसार नवीन दुकाने, फर्म, यात्रा आदींचा प्रारंभ पाडव्यापासून केला जाणार आहे. सोने-चांदी व हि-यांचे दागिने, वाहने, जमीन वा घर खरेदीसाठीही हा मुहूर्त शुभ असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानल्या जाणा-या गुढीपाडव्याचा सण रविवारी नाशिककर विविध कार्यक्रमांनी साजरा करणार आहेत. यांत शहरातील विविध भागांतून शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संगीत कार्यक्रम, पाडवा पहाट मैफल आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील पुरुष मंडळी पारंपरिक पोशाखात तयार झाल्यानंतर, गुढी उभारतात. प्रथम घरातील समोरच्या दरवाजाजवळ ही काठी आणून ती स्वच्छ धुऊन तिला कडुनिंब व आंब्याच्या डहाळ्या बांधल्या जातात. बांबूच्या काठीच्या शेंड्याला नवा कपडा, फुलांची माळ, साखरेची माळ आणि डहाळ्या एकत्र करून बांधतात. त्यावर तांब्या लावतात. तांब्याला हळदी-कुंकू लावतात. त्यानंतर घराच्या खिडकीत किंवा योग्य ठिकाणी गुढी उभारली जाते. घरातील महिला त्या गुढीचे औक्षण करून दुपारी पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतात. दुपारनंतर गुढी उतरविली जाते.
गुढीपाडव्याला नवीन कामांची सुरुवात होत असल्याने, तसेच हिंदू पंचांगालाही सुरुवात होत असल्याने मंदिरांमध्ये पंचांगांचे वाचन केले जाते. वर्षफलिताचे वाचन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील लहान मुले सरस्वती पूजन करून पुस्तके, वह्या आदींची पूजा करतात. गुढीपाडव्यानिमित्त म्हणून पुरणपोळी, श्रीखंड, रसमलाई, बासुंदी, जिलेबी आदींचा बेत घरोघरी रंगणार आहे.
भगवान श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून, अयोध्येला परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्यानगरी दारात गुढ्या उभारून, अंगणात रांगोळ्या काढून, दाराला तोरणे बांधून सजविण्यात आली. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा होऊ लागला. म्हणूनच, घरोघरी गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करतात.
शालिवाहन शके विश्ववसू नाम संवत्सराला चैत्र शु. प्रतिपदा शके १९४७, रविवारी (दि. ३०) सुरुवात होत आहे. या दिवशी गुढीपाडवा साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. प्रत्येक घरावर गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करताना गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात शोभायात्रा काढण्यात येत आहेत.
नववर्षानिमित्त शहरातील नववर्ष स्वागत समिती शहर व पश्चिम भागातर्फे जवळपास २२ भागांतून शोभायात्र काढल्या जाणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून सुरू होणा-या शोभायात्रांमध्ये लेझीम पथक, तलवार पथक, लाठीकाठी पथक, ढोल-ताशा पथक, ध्वजपथक सहभागी असेल. शोभायात्रेत गुढीच्या रथावर सरदार चौक मित्र मंडळाचा गणपती, भारत माता पालखी, गोपीनाथ गौडीय मठ यांचा चित्ररथ व नगर संकीर्तन, गोशाळेचा चित्ररथ मुख्य आकर्षण असणार आहे. काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, साईबाबा मंदिर-कलावती आई मंदिर, मखमलाबाद नाका, खुटवडनगर, पवननगर, तिडके कॉलनी, उषाकिरण सोसायटी, संभाजी चौक, पारिजातनगर, योग विद्या धाम, पाटील लेन, पंडित कॉलनी, श्रीराम मंदिर, कॉलेज रोड, नरसिंहनगर, महात्मानगर, पी अॅण्ड टी कॉलनी आदी भागांतून या शोभायात्रा निघतील.
