नाशिक मनपा सिंहस्थातील रस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सिव्हीलटेक कंपनीची नेमणूक आणि नेमणार सल्लागार!

नाशिक (प्रतिनिधी): कामे मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडावीत, यासाठी सविस्तर प्राकलन, सर्वेक्षण आणि डिझाइन तयार करण्याची जबाबदारी सल्लागार कंपनीकडे देण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली असून, स्थायी समितीनेही निर्णयाला मंजुरी दिली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५९ रस्त्यांची कामे हाती घेण्याची तयारी आहे. यापैकी २७ रस्त्यांच्या कामांना सिंहस्थ प्राधिकरणाची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. उर्वरित कामांना टप्प्याटप्प्याने मंजुरी मिळणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत व बाह्य रिंगरोड या महत्त्वाच्या कामांबरोबरच मुकणे पाणीपुरवठा विस्तारीत योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेने कुंभमेळा प्राधिकरणाकडे एकूण ५९ रस्त्यांची कामे मंजुरीसाठी सादर केली आहेत. रस्त्यांची प्राकलने ढोबळ व अंदाजित स्वरुपाची असल्याने सविस्तर प्राकलने तयार करताना रस्त्यांचे सर्वेक्षण आयआरसी, मॉर्थ तसेच पीडब्ल्युडी बी या संस्थांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विविध चाचण्या घेऊन ५९ रस्त्यांचे मानकंनाप्रमाणे डिझाईन करुन त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने १० सल्लागारांकडून देकार मागविले होते. त्यापैकी सिव्हीलटेक इंडीया प्रा. लि. नाशिक यांनी सर्वात कमी दराने कामे विहीत वेळेत पूर्ण करुन देण्याची तयारी दर्शविली आहे.
५९ रस्त्यांच्या प्रस्तावांपैकी कुंभमेळा प्राधिकरणाने आधी १८ आणि त्यानंतर आता नऊ अशा २७ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. उर्वरित रस्त्यांच्या कामांना टप्याटप्प्याने प्रशासकीय मान्यता मिळणार असली तरी प्राधिकरणाकडून नेमक्या किती रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार याची निश्चितता नाही. त्यामुळे सल्लागार कंपनीकडून ५९ कामांचा स्वतंत्र कामनिहाय वेगवेगळे प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झालेल्या व इतर रस्ते कामांचा सविस्तर डीपीआर (विकास आराखडा) तयार करण्यासाठी सिव्हीलटेक कंपनीची नेमणूक आणि सल्लागार शुल्काच्या खर्चास महासभेनंतर आता स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!