नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेतील विविध विभागांना भेटी देत कार्यालयीन स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांना त्यांच्या टेबलवरील आणि संपूर्ण विभागातील स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या. तसेच कार्यालयातील संपूर्ण अभिलेख वर्गीकरण करून आठ दिवसांच्या आत त्यांना योग्य प्रकारे अभिलेख कक्षात जमा करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी अभिलेख वर्गीकरणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, लगेचच उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी यासंदर्भात प्रशिक्षण दिले. यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अभिलेखाचे अ, ब, क, ड वर्गीकरण तसेच ६ गट्ठे पद्धत याअंतर्गत प्रलंबित प्रकरणे, नियतकालिके, स्थायी आदेश संचिका, अभिलेख कक्षात पाठविण्यात येणारी प्रकरणे, नाश करावयाची कागदपत्रे याबद्दल प्रशिक्षण दिले. जिल्हा परिषद मुख्यालयातील १८ विभागांमध्ये कार्यरत ४०० अधिकारी व कर्मचारी यांना ६-६ विभागांच्या गटाने अभिलेख वर्गीकरणाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
