मालेगाव तालुक्यातील संतापजनक घटना : मुख्यमंत्र्यांनी ही घेतली दखल!
मालेगाव (प्रतिनिधी): डोंगराळे येथून रविवारी (दि. १६) तीनवर्षीय बालिका बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर तीन तासांनी तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह प्राथमिक शाळेजवळील मोबाइल टॉवरजवळ आढळला. याबाबत माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांसह अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, उपविभागीय पोलिस अधीक्षक दर्शन दुगड आदींनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ तपासचक्रे फिरवत संशयित विजय खैरनार (वय २४) याला ताब्यात घेतले. विजय याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. नाशिक येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
तीनवर्षीय अपहृत बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा संतापजनक व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि. १७) मालेगाव-कुसुंबा मार्गावर रास्ता रोको केला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत, याप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून संशयितास कठोर शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बालिकेवर लैंगिक अत्याचारानंतर तिचा दगडाने ठेचून खून केल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थानी केला आहे. याप्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. सोमवारी सकाळपासून मालेगाव-कुसुंबा महामार्ग रोखून धरला. तीन तास आंदोलन चालले. तणाव वाढण्याची चिन्हे लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. मंत्री दादा भुसे यांच्यासह पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तिकडे धाव घेत कुटुंबीयांशी चर्चा केली. ना. भुसे यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.
