नाशिक : मखमलाबाद शिवारात चेन चेनस्नॅचिंग धुमाकूळ घातला असून, सोमवारी (दि.१५) अवघ्या पंधरा मिनिटांत वेगवेगळ्या भागातून पायी जाणाºया दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले. या घटनेत सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोड भागातील हर्षला हेमराज नेमाडे (रा. पिंगळे कॉलनी, राहू हॉटेलजवळ, पेठ रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नेमाडे दाम्पत्य सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास परिसरातील मंदिरातून देवदर्शन करून घराकडे जात असताना ही घटना घडली. गजानन पेट्रोल पंपा मागून नेमाडे दाम्पत्य राहू हॉटेलच्या दिशेने रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. दुसरी घटना अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतराने परिसरातील रामकृष्णनगर भागात घडली. सुवर्णा प्रमोद कुºहे (रा. रामकृष्णनगर) या देवदर्शनासाठी परिसरातील मंदिरात जात असताना श्रेया रेसिडेन्सीसमोर दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक पवार करीत आहेत
