शिर्डीतील साई मंदिर सुरक्षेबाबत हायकोर्टाने मागविला अहवाल
उपाययोजनांसाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश
नाशिक : दहशतवाद्यांकडून धोका असल्याने शिर्डीतील साई मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. मात्र, ही व्यवस्था तोकडी असल्याने मंदिराच्या सुरक्षेसाठी ‘सीआरपीएफ’ किंवा ‘सीआयएसएफ’ची तुकडी तैनात करण्यासंदर्भात सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने दिले आहेत. या समितीने सुरक्षेचा गोपनीय अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत खंडपीठात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिर व परिसराची सुरक्षा सीआरपीएफ किंवा सीआयएफएस यांच्याकडे देण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका खंडपीठात दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, विविध पोलीस अधिकारी व साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी वेळोवेळी मंदिराची सुरक्षा सीआरपीएफ किंवा सीआयएफएस यांच्या मार्फत करण्यात यावी, यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शिर्डी येथे गुन्हेगारीचे प्रमाण रोज वाढतच असून, साईभक्तांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत उच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशातील उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना तिरुपती बालाजी देवस्थानात तैनात सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार माहिती सादर करण्यात आली आहे
