नाशिक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण‘ योजनेपासून पाच लाख बहिणी वंचित!

  • साडेसहा लाख बहिणींना मिळाली भाऊबीज!
  • ९५ टक्के महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा प्रशासनाचा दावा
नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण‘ योजनेत दरमहा १५०० रुपये देण्याची योजना जाहीर केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून तब्बल साडेसात लाख अर्ज त्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६ लाख ५० हजार महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे, तर आतापर्यंत ११ लाख अर्ज दाखल झाले असून, अजून दोन लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यांत १७ ऑगस्ट रोजी तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून, यात नाशिक जिल्ह्यातील ६ लाख ५० हजार महिलांचा समावेश आहे. पात्र लाभार्थीचे पैसे बँक खात्यात येण्यासाठी बँक खात्याशी आधार जोडणी असणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात जवळपास २७ लाख ४३ हजार ३१४ महिलांच्या आधार क्रमांकाची बँक खात्यांशी जोडणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील चार लाख ५२ हजार ५०६ महिलांचा समावेश असून, नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक एक लाख ४३ हजार ६८३ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनेक बहिणी आता तीन हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७ लाख १६ हजार ८० अर्ज त्या अंतर्गत स्वीकृत करण्यात आले होते, तर १४४० अर्ज नाकारण्यात आले. अर्ज स्वीकारण्यात आलेल्या बहिणींपैकी ९५ टक्के महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!