नाशिक (प्रतिनिधी): शहरात मुला-मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळ्या भागात राहणारी तीन अल्पवयीन मुले नुकतीच बेपत्ता झाली आहेत. त्यात दोन मुलांसह एका मुलीचा समावेश असून, तिघांचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पंचवटी, अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ रोड भागातील अल्पवयीन मुलगा बुधवार (दि. २१) पासून बेपत्ता आहे. सकाळच्या सुमारास घराबाहेर पडलेला मुलगा घरी परतला नसून, त्याचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय कुटुंबीयांनी वर्तविला आहे. याबाबत मामाने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. दुसरा मुलगा सिडको भागातून बेपत्ता झाला. माउली लॉन्स परिसरात राहणारा मुलगा बाहेरून जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला तो अद्याप परतला नाही. त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पालकांनी पोलिसांत धाव घेतल्याने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत. तिसरा प्रकार नाशिकरोड भागात घडला. मावशीच्या घरून टीव्हीचा रिमोट घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी अद्याप घरी परतली नाही. शुक्रवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास ती घराबाहेर पडली होती. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी भावाने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक काळे करीत आहेत.
