खासगी सावकार देवरेने १९ तोळे सोने पचवले आणि व्याजापोटी १५ लाखांची केली मागणी

अंबड पोलीस ठाण्यात खैरनार, देवरे आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील खुटवडनगर येथील एका व्यापाºयाला गहाण ठेवलेले सोने परत न करता उलट त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संशयित खासगी सावकार वैभव देवरे याचे नाव समोर आले असून, देवरे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित देवरे आणि त्याच्या साथीदारांनी व्यापा-याला चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले, तसेच सुरा दाखवत १५ लाख रुपये देण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार भाऊसाहेब नामदेव कदम (वय ४५) यांनी काही वर्षांपूर्वी हरिभाऊ खैरनार नावाच्या व्यक्तीकडे १९० ग्रॅम सोने गहाण ठेवले होते. मात्र, वेळोवेळी विनंती करूनही खैरनारने कदम यांना त्यांचे सोने परत केले नाही. जेव्हा कदम यांनी आपले सोने परत मागितले, तेव्हा खैरनारने त्याला उलट धमकावण्यास सुरुवात केली. खैरनारने त्याचा साथीदार वैभव देवरे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींसह कदम यांना चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले, तसेच वाहनातच खैरनारने कदम यांना धमकी देत व्याजाचे पैसे मिळून तुझ्याकडे १५ लाख रुपये होतात. ते पैसे दिले नाही, तर तुला सोने मिळणार नाही. गाडीत बसलेले हे तिघे आताच मर्डर केसमधून जामीनवर बाहेर आले आहेत. तुला घरी येऊन फाशी देऊ किंवा गाडीखाली चिरडून टाकू, कोणाला कळणारही नाही, अशी धमकी दिल्याचे भाऊसाहेब कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
एवढेच नव्हे, तर वैभव देवरेने कदम यांना सुरा दाखवत १५ लाख रुपये देण्याची धमकी दिली. त्यानंतर देवरे आणि त्याच्या साथीदारांनी कदम यांच्या घरी जाऊन घरातील खिडक्यांच्या काचा फोडल्या, दुचाकीचे नुकसान केले आणि कदम यांना बेदम मारहाण केल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून अंबड पोलीस ठाण्यात हरिभाऊ खैरनार, वैभव देवरे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!