आज सोमवार शक्तिप्रदर्शनाचा दिवस; कोणीही साधला नाही गुरुपुष्यामृताचा योग

नाशिक (प्रतिनिधी): गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर एकीकडे ग्रामीण भागातील २० उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असताना दुसरीकडे शहरातील मतदारसंघाचे चित्र अस्पष्टसे असल्यामुळे अपवाद वगळता कोणीही हा योग साधला नाही. नाशिकमधील तीन मतदारसंघांत उमेदवार निश्चितीचा घोळ अद्यापही सुरू असल्याने राजकीय वातावरण तापलेले नाही. त्यामुळेच तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांकडूनही गुरुवारी (दि. २४) अर्ज दाखल झाले नाहीत. केवळ एकाच इच्छुकाने अर्ज दाखल केला; तर माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर दशरथ पाटील, गणेश गिते, उद्धव निमसे, अतुल मते यांच्यासह एकूण ४६ इच्छुकांनी ८५ अर्ज खरेदी केले.

नाशिक पश्चिममधून आतापर्यंत ८१ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. गुरुवारी (दि. २४) आठ इच्छुकांनी १३ अर्ज नेले. त्यामध्ये माजी महापौर दशरथ पाटील, माजी आमदार नितीन भोसले यांचा समावेश आहे. येथून दिलीप भामरे यांनी अपक्ष आणि भारतीय जनता पक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात १० जणांनी १६ अर्ज नेले असून, त्यात शिवाजी गांगुर्डे, सुषमा गोराणे यांचा समावेश आहे. तर येथून अक्षय जाधव यांनी भाजप व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. नाशिक पूर्वमधून १४ जणांनी ४७ अर्ज नेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!