नाशिक (प्रतिनिधी): दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आताषबाजी आलीच. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वाजवण्यात येणा-या या फटाक्यांमुळे कधी-कधी दुष्परिणाम देखील होतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फटाक्यांसंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, नागरिकांनी फटाके गर्दीच्या ठिकाणी न उडविता मोकळ्या जागेत उडवावेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत फटाक्यांचा आवाज १२५ डेसिबलपेक्षा अधिक नसावा. रात्री दहा ते सकाळी ६ यावेळेत फटाके फोडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
वर्षभरातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीस सोमवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. बच्चे कंपनीकडून फटाक्यांची मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिवाळी व इतर सणाच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी व वायू प्रदुषणाचे जनतेवर होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत फटाक्यांच्या आवाजाच्या मानकांबाबत सुधारित नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.
मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे, शोभेचे दारू काम निष्काळजीपणाने करणे आदी संभाव्य कृत्यांमुळे जनतेच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फटाक्यांसंदर्भात काही नियम घालून देण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पोलीस अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यात अधिसूचना लागू करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार फटाका उडविणाºया जागेपासून ४ मीटरपर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाºया फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरासाठी बंदी घालण्यात आली आहे. संबंधित परवाना प्राधिकारी यांनी फटाका परवाना देताना तो गर्दी, वर्दळ, सार्वजनिक रस्ता, शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळाशेजारी न देता अन्यत्र मोकळ्या जागेत असेल अशा ठिकाणी देण्याची कार्यवाही करावी, साखळी फटाक्यांसाठी नमूद केलेल्या आवाजाच्या मर्यादेच्या पातळीत ५ लॉग १० (एन) डेसिबलपर्यंत शिथिलता देण्यात येत आली आहे. तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटरपर्यंत अनुक्रमे ११५, ११० व १०५ डेसिबल एवढी असावी, असेही स्पष्ट केले आहे.
