सिलिंडरचा स्फोटात अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी!

जुने नाशिक (प्रतिनिधी): चव्हाटा भागात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अग्निशमन दलाचे तीन जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंद घरातून धूर निघत असल्याच्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी दरवाजा तोडताच हा स्फोट झाला. या घटनेत दुमजली माडी ढासळली असून, दोन कुटुंबीयांचा संसार बेचिराख झाला आहे. सुदैवाने येथील भाडेकरू कुटुंबीय घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. हा स्फोट इतका भयंकर होता की त्याच्या हाद-याने परिसरातील काही घरांनाही तडे गेले आहेत. बंद घरात जमा झालेल्या धुराचे गुपित उलगडले नसले तरी धुरामुळेच सिलिंडरचा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्य फायरमन इसहाक शफियोद्दीन शेख (वय ५५), प्रशिक्षणार्थी फायरमन प्रथमेश संंजय वाघ (वय २१) व आकाश भगवान गिते (वय २९) अशी जखमी कर्मचाºयांची नावे आहेत. त्यातील शेख यांना गंभीर दुखापत झाली असून, तिघांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभागास गुरुवारी (दि. १२) सायंकाळच्या सुमारास जुने नाशिक येथील चव्हाटा भागात आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक मारुती मंदिराच्या बाजूला असलेल्या न्यू शिवम ज्वेलर्स या दुकानाजवळ पोहोचले. शुभम कृष्णकांत धाडा (रा. काठेगल्ली) यांच्या मालकीच्या दुमजली माडीतील दुस-या मजल्यावर वास्तव्यास असलेले भाडेकरू शरद गायकवाड यांच्या बंद घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने तात्काळ दरवाजा तोडला. त्याचक्षणी सिलिंडरचा स्फोट झाला. निमुळत्या गल्लीबोळातून पाण्याचा बंब घेऊन पोहोचलेल्या पथकाने घरात शिरून पाण्याचा मारा करण्यास प्रारंभ करताच स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भंयकर होता की संपुर्ण परिसर हादरला. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. या स्फोटामुळे उभ्या इमारतीच्या भिंतीस तडे गेले. लाकडी वाडाही ढासळला. स्फोटात पहिल्या आणि दुस-या मजल्याच्या माळ्यास भगदाड पडल्याने भाडेकरू गायकवाड आणि पहिल्या मजल्यावर राहणा-या मारुती पाटील यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. अचानक झालेल्या स्फोटात तीन कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या भद्रकाली पोलीस व अग्निशमनच्या उर्वरित कर्मचा-यांनी धाव घेत जखमी कर्मचा-यांना सुखरूप घराबाहेर काढले आहे. दोन्ही घरांत वास्तव्यास असलेले गायकवाड व पाटील कुटंबीय भाडेतत्त्वावर या माडीत राहत असून, ते मुलाबाळांसह आपआपल्या कामावर गेलेले असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. धूर कशाचा झाला असावा, याबाबत चर्चेस उधाण आले आहे.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!