सिन्नर (प्रतिनिधी): दुकानात शिरून एकावर चाकूने सपासप वार करीत, गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची घटना सिन्नर येथील वावी वेस परिसरात बुधवारी (दि. १८) दुपारी घडली. या घटनेत सागर नामदेव लोंढे (वय ३०) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीची कारवाई करत नांदूर शिंगोटे येथून एकास जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी उपनगराध्यक्ष तथा सगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नामदेव लोंढे यांचे पुत्र सागर लोंढे आपल्या दोस्ती ट्रेडर्स या स्टील व्यवसायाच्या दुकानात बसले असताना, बुधवारी (दि. १८) दुपारी १.४५ च्या सुमारास कारमधून आलेल्या चौघांपैकी तीन जण दुकानात शिरले. आत जाताच हातात असलेल्या धारदार शस्त्राने तिघांपैकी एकाने सागरवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी सागरच्या पोटावर, पाठीवर हातावर खोल जखमा झाल्या. कारमध्ये असलेल्या एकाने हातात असलेल्या रिव्हॉल्व्हरने सागरच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी सागरच्या डोक्याला चाटून गेली.
हा सर्व प्रकार घडत असताना आजूबाजूच्या लोकांना याबाबत समजल्याचे पाहून, चारही संशयितांनी कारमधून संगमनेर नाक्यापासून नाशिक-पुणे रोडने नांदूर शिंगोटेकडे धूम ठोकली. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी नांदूर शिंगोटे आउट पोस्टला कळवून नाकेबंदी केली. हल्लेखोर नांदूर शिंगोटेजवळ पोहोचले तेव्हा नाकाबंदी झाल्याचे लक्षात येताच त्यांची धांदल उडाली. त्या गडबडीत त्यांची कार दुभाजकावर आदळून टायर फुटल्याने चौघेही त्याच ठिकाणी कारमधून उतरून पळून गेले. पोलिसांनी तत्काळ त्यांचा शोध सुरू केला असता, एक संशयित नांदूर-शिंगोटे परिसरातील एका मक्याच्या शेतात लपल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यास तातडीने जेरबंद करीत ताब्यात घेतले. तुषार रामदास जाधव (वय २५, रा. मोरवाडी, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. याच वेळी पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनीही घटनास्थळी भेट दिली. या हल्ल्याचा सूत्रधार, हल्लेखोरांना कार, हत्यारे कोणी पुरविली याचा तपास करण्यात येणार असल्याचे देशमाने यांनी सांगितले. तसेच, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारची (एमएच ०३ सीएस ४२१२) नंबरप्लेट बनावट असून, त्या कारबाबतही तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.