नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यांनतर कोणते खाते कोणाच्या वाटेला येणार अन् कोणत्या खात्याचा कारभारी कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि भाजपकडून अशोक उईके या दोन आदिवासी आमदारांनी शपथ घेतल्याने या दोन्हींपैकी आदिवासी विकास मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे समाजबांधवांबरोबरच या नेत्यांच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे.
मागील मंत्रिमंडळात नंदुरबारचे डॉ. विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून भाजपकडे आदिवासी विकासमंत्र्यांची जबाबदारी होती. मात्र, या निवडणुकीत गावित यांची मुलगी, दोन्ही भाऊ यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने गावित यांना यावेळच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता आदिवासी विभागाला नवा चेहरा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आदिवासी आमदारांचे नेतृत्व आणि पेसा भरतीवरून मंत्रालयात आंदोलन केल्यामुळे झिरवाळ यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी आदिवासी आमदारांकडून जोरदार प्रयत्न करत त्यांनी लॉबिंगही केले. त्यामुळे झिरवाळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. आदिवासी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावचे भाजप आ. अशोक उईके यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे या दोघांपैकी आदिवासी विकास मंत्रिपद कुणाच्या वाट्याला येणार, याबाबतची उत्सुकता आहे.