नाशिक (प्रतिनिधी): एक्साइज विभागाच्या वाहनास अपघात झाल्यानंतर केंद्र शासित दारू तस्करीचा भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तस्करीत दारूने भरलेल्या वाहनास दुस-या वाहनातून संरक्षण दिले जात असल्याचे वास्तव समोर आले असून, आठ ते दहा वाहनांतून राजरोसपणे ही बेकायदा वाहतूक सुरू आहे. अपघाताच्या गुन्ह्यात एक चालक थेट न्यायालयात हजर झाल्याने दुस-यास गुजरात राज्यातून बेड्या ठोकण्यात आल्या असून, या कारवाईत दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही दारू शहरासह जिल्ह्यासह परजिल्ह्यात कोणास पुरविली जाते, याबाबत पोलीस शोध घेत आहेत.
ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार देवीश कांतीलाल पटेल (३७, रा. चिंचवाडा, ता.जि. बलसाड) व अश्पाक अली मोहब्बत शेख (वय २२, रा. युनिक अपा., नवसारी, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सिल्वासा येथून गुजरात पासिंग असलेल्या ८ ते १० वाहनांतून मुंबई-आग्रा महामार्गाने बेकायदा दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली होती. नवापूर आणि नवसारी भागात हा दारूचा साठा जाणार असल्याच्या माहितीवरून रविवारी (दि.७) रात्री एक्साइज विभागाच्या अ व ब भरारी पथकांनी महामार्गावरील गरवारे पॉइंट, द्वारका व आडगाव या ठिकाणी सापळा लावत ग्रे कलरची क्रेटा गाडीस थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडी शहरात न थांबता औरंगाबाद रस्त्याने निफाडच्या दिशेला वेगात निघून गेली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी याबाबत ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षास माहिती दिली होती. त्यामुळे या मार्गावर नाकाबंदी लावण्यात आली होती. मात्र, मद्यतस्करांनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालत गुंगारा दिला होता. निफाड येथील रेल्वे गेट तोडून पोबारा करणा-या या वाहनाचा एक्साइज विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग केला. या पथकाच्या मदतीला नाकाबंदीवरील लासलगाव येथील दोन पोलिसांनी मदतीचा हात दिला. एक्साइजचे दोघे कर्मचारी आणि पोलीस असा एका वाहनातून संयुक्त पाठलाग सुरू असताना हा अपघात झाला होता. चांदवड मार्गावरील हर्नुल टोलनाका परिसरात भरारी पथकाने वाहन आडवे लावून तस्करांना थांबण्याचा प्रयत्न केला असता ग्रे रंगाच्या क्रेटा कारने एक्साइजच्या स्कार्पिओला धडक देत पोबारा केला होता. या अपघातात एक्साइचे वाहन पलटी झाल्याने कैलास कसबे नामक चालकाचा मृत्यू झाला. दोघा पोलिसांसह एक्साइज विभागाचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेतील ग्रे कलरच्या क्रेटा कारचा चालक देवीश पटेल चांदवड न्यायालयात शरण आल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे. न्यायालयाने त्यास पोलिसांच्या स्वाधिन केले असून, पोलीस कोठडीत त्याने या घटनेचा उलगडा केला आहे.
