‘लाडकी बहीण’साठी जिल्ह्याभरात अर्ज वाढले!

नाशिक (प्रतिनिधी): ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी शहरातील आपले सरकार केंद्र, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, सेतू कार्यालयात महिलांची झुंबड उडाली आहे. मात्र, या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.
योजनेची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सहा हजार १२५ लाभार्थी महिलांचे आॅफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यात ३१६४ अर्ज आॅनलाइन भरण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्यान विभागाचे अधिकारी सुनील दुसाने यांनी दिली आहे. आॅनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर बंद पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक शहरासह नाशिक तालुक्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी ई-सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, रेशन कार्डमधील नाव कमी करणे किंवा समाविष्ट करण्यासाठी नाशिक तहसील कार्यालयाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. कागदपत्रांचा कुठलाही अडसर येऊ नये, यासाठी शहरात विभागनिहाय ई-सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत अर्ज भरले जात असल्यामुळे तहसील कार्यालयावरील कामाचा ताण हलका झाला आहे. ई-सेवा केंद्र चालकांना अर्ज भरण्याचे दरपत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. आनलाईन अर्ज भरतांना मात्र ई-सेवा केंद्र चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार नेटवर्कचा प्रश्न निर्माण होत असल्याने अर्ज अपलोड होण्याची संख्या अल्प प्रमाणात आहे. त्यातच गेल्या सप्ताहात योजनेची लिंकच उपलब्ध न झाल्याने अर्ज दाखल करावा कुठे, असा प्रश्न केंद्रचालकांसह लाभार्थाना पडला होता. आता हा प्रश्न मिटला असला तरी तांत्रिक अडचणींचा मात्र सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून आॅफलाइन फॉर्म भरून घेतले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!