नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात, सिटीलिंक शहर बससेवेला आता एनपीएस मॅनपॉवर फॅसिलिटीज सर्व्हिसेस हा नवीन ठेकेदार मिळाला असून, या ठेकेदाराकडील वाहकांच्या हाती आता मनपाची शहर बससेवा सोपविण्यात आली आहे. याआधीच्या मॅक्स सेक्युरिटीज या ठेकेदार कंपनीची मुदत ७ जुलै रोजी संपुष्ठात आल्याने नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून, जुन्या ठेकेदाराकडील वाहकांनी गेल्या तीन वर्षात तब्बल दहा वेळा संप केल्याने हा ठेकाच वादात सापडला होता.
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे नवीन ठेकेदाराची नियुक्तीची प्रक्रिया रखडली होती. निविदेत कमी दरात काम करण्याची तयारी ‘एनपीएस मॅनपॉवर’ या ठेकेदार कंपनीने दर्शविल्याने सात दिवसांच्या तात्पुरत्या करारावर वाहक पुरवठ्याचे काम या कंपनीला देण्यात आले आहे. सोमवारी (दि. ८) पंचवटीतील तपोवन बस डेपोतील दीडशे तर नाशिकरोड डेपोतील ५० अशा २०० बसेस सुरळीत सुरू होत्या. महापालिकेने ग्रॉस कॉस्ट तत्वावर सिटीलिंक कनेक्टिंगच्या माध्यमातून ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवा सुरू केली. एकूण अडीचशे बसेस सिटीलिंकच्या ताफ्यात आहेत. या बसेसकरिता वाहक पुरवठ्याचे काम दिल्लीस्थित मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज या कंपनीला देण्यात आले होते. हा ठेका सुरूवातीला काही महिने व्यवस्थित सुरू होता. मात्र त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून वाहक कर्मचाºयांना नियमित वेतन न देणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेचा भरणा न करणे, कर्मचा-यांवर दंडात्मक कारवाई, अशा अनेक कारणांमुळे वाहकांना गेल्या तीन वर्षात तब्बल दहा वेळा संप करावा लागला. जुन्या ठेकेदाराची मुदत ७ जुलै रोजी संपुष्ठात आली. तत्पूर्वी नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया बंद पडली होती. अत्यावश्यक सेवेमुळे मनपाने तात्पुरत्या स्वरूपात तोडगा काढत नवीन ठेकेदाराला सात दिवसांची परवानगी देत सिटीलिंक बससेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

