नाशिक (प्रतिनिधी) : कॉम्प्युटर दुकानदारांकडून माल घेण्यासाठी पोस्ट डेटेड चेक देत जवळपास ४८ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक करीत संशयित मंदार पाटील फरार झाल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, जयेश संजय पेंढारकर (वय २८, रा. सप्तश्रृंगी अपार्टमेंट, तिडकेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पेंढारकर यांच्यासह इतर १७ कॉम्प्युटर दुकानदारांची ४८ लाख ३३ हजार २४२ रुपयांची फसवणूक करून संशयित मंदार पाटील हा फरार झाला. संशयित मंदार पाटील याने जयेश पेंढारकरला १७ डिसेंबर २०२३ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान काही धनादेश दिले होते. हे सर्व धनादेश बाऊन्स झाले. त्यामुळे जयेशने मंदारला फोन करून चेक बाऊन्स झाल्याचे सांगितले व चेक बाऊन्स झाल्याचे फोटो व्हॉट्सअॅपवरही पाठविले. त्यावेळी मंदारने फोनवरून पैसे घेण्यासाठीच तीन दिवसांपासून सुरतला आलो असल्याचे जयेशला सांगितले. जयेशने यावर विश्वास ठेवत तीन दिवस वाट पाहिली. त्यानंतर जयेशने मंदारला फोन केला असता मोबाइल व व्हॉट्सअॅप बंद करण्यात आल्याचे जयेश पेंढारकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे जयेशने इतर कॉम्प्युटर दुकानदारांशी संपर्क साधला असता, त्यांनाही मंदारने चेक देत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले. हे सर्वजण मंदारच्या कॅनडा कॉर्नरवरील दुकानाजवळ गेले असता, दुकानही बंद होते. त्याच्या आधारकार्डवरील पत्यावर जाऊन चौकशी केली असता, तो तेथे राहतच नसल्याचे समोर आल्याने संशयिताने जयेश पेंढारकरची १७ लाख ५४ हजार ८५० रुपयांची तर इतर कॉम्प्युटर दुकानदारांची मिळून एकूण ४८ लाख ३३ हजार २४२ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानुसापर पिडित व्यावसायिकांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
