डॉक्टरकडून सहा लाखांची खंडणी मागणा-या तिघांवर गुन्हा दाखल

ओझर (प्रतिनिधी): बाजारपेठेतील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रक्कमचा जाब विचारत दमबाजी, शिवीगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणा-या तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
काही महिन्यांपूर्वी स्वाती युवराज बंदरे या उपचारासाठी डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या रुग्णलायात दाखल झाल्या. महत्वाच्या आरोग्य तपासण्या झाल्यानंतर मेंदूच्या उजव्या बाजूस शस्त्रक्रिया करण्याचे निदान केले. त्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल, त्यावरील फरक नातेवाईक देण्यास राजी झाले. मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सहायता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले. उर्वरित एक लाख बत्तीस हजार रुपये देणे, असताना नातेवाईकांनी ६७ हजार ५०० रोख स्वरूपात जमा केले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने उर्वरित रक्कम संचालक डॉ. विश्वनाथ पाटील यांनी उत्तरदायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले. मात्र काही दिवसांनंतर रुग्णाचे जावई म्हणून संशयित योगेश नाना पाटील व जयेश वासुदेव ढिकले आणि एक अनोळखी असे तिघांनी डॉक्टरांच्या केबिन मध्ये येत तुम्ही स्वाती बंदरे रुग्णाबाबत सहायता निधी येऊनही पेशंट कडून रोख रक्कम का घेतली? असा जाब विचारला. त्यावर डॉ. पाटील यांनी नातेवाईकांना सांगितलेली सर्व हकीकत पुन्हा संशयितांना सांगितली. परंतु,संशयित ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने त्यांनी तू हॉस्पिटल कसे चालवतो, बघून घेतो म्हणत दमबाजी करीत डॉ. पाटील यांना शिवीगाळ केली. दुस-यादिवशी डॉ. पाटील यांनी पुन्हा संसयितांस समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु. संशयितांनी विषय थांबवायचा असेल, तर रुग्णाचे घेतलेले पैसे परत करा आणि आम्हाला सहा लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. यावर डॉ. विश्वनाथ पाटील यांनी त्यांना अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांकडून दमबाजी करीत खंडणीची मागणी सुरूच असल्याने रुग्णालय प्रशासनाने मुख्यमंत्री सहायता निधीची रक्कम देखील शासनास परत पाठवून दिली. त्यानंतरही संशयितांनी खंडणीची मागणी सतत सुरू ठेवली. मात्र डॉ.पाटील यांनी नकार दिल्याने संशयितांनी सोशल मीडियावर बदनामी सुरू केल्याने डॉ. विश्वनाथ पाटील यांच्यासह ओझरच्या डॉक्टरांनी अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी योगेश नाना पाटील, जयेश वासुदेव ढिकले आणि अन्य एक अशा तिघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिनकर वाघेरे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!